चेन्नई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या तमिळनाडूच्या खेळाडूला ३ कोटी रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे. तमिळनाडूत खेळाडूंसाठी विशेष कोरोना विरोधी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात स्टॅलिन बोलत होते.
स्टॅलिन म्हणाले की, 'आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी तमिळनाडू सरकार कटिबद्ध आहे. त्याचाच भाग म्हणून सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ३ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला २ कोटी रुपये आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला १ कोटी रुपये रोख देण्यात येणार आहे.'
तमिळनाडू सरकारकडून ही रोख रक्कम देण्यात येईल. राज्य सरकार कायम खेळाडूंना पाठिंबा आणि प्रोत्साहन देईल. खेळाडूंना शारीरिक मजबूती आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असते. आम्ही डीएमकेच्या घोषणापत्रात तमिळनाडूत ४ विभागात ऑलिम्पिक अकॅडमी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही ते देखील पूर्ण करणार आहोत, अशी ग्वाही देखील स्टॅलिन यांनी यावेळी दिली.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, तमिळनाडूत खेळाडूंसाठी विशेष कोरोना विरोधी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी नेहरू स्टेडियमवर याचे उद्घाटन केले. तमिळनाडू खेळ विकास प्राधिकरणाच्या युवा कल्याण आणि खेळ विभाग, आरोग्य विभाग आणि तमिळनाडू ऑलिम्पिक संघाने संयुक्तपणे या लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.