महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राष्ट्रीय कोचने ऑलिम्पिक पात्रता सामना फिक्स करायला सांगितले होते, मनिका बत्राचा गंभीर आरोप - Soumyadeep Roy

भारतीय टेबल टेनिस स्टार मनिका बत्राने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर गंभीर आरोप लावले आहे. रॉय यांनी मला मार्च महिन्यात झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीतील सामना पराभूत होण्यास सांगितलं होतं, असे मनिकाने म्हटलं आहे. मनिकाच्या आरोपाने टेबल टेनिस विश्वात खळबळ उडाली आहे.

table-tennis-player-manika-batra-says-national-coach-soumyadeep-roy-told-me-to-lose-in-olympics
table-tennis-player-manika-batra-says-national-coach-soumyadeep-roy-told-me-to-lose-in-olympics

By

Published : Sep 4, 2021, 10:43 PM IST

मुंबई -राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांनी मार्चमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत, मला सामन्यात पराभूत होण्यास सांगितलं होतं, असा गंभीर आरोप टेबल टेनिस स्टार मनिका बत्राने केला आहे. या कारणानेच मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकेरी स्पर्धेदरम्यान, रॉय यांची मदत घेतली नव्हती, असे देखील मनिकाने म्हटलं आहे.

नेमके आहे आहे प्रकरण

मनिका बत्रा टोकियो ऑलिम्पिकला आपल्या खासगी प्रशिक्षकासह टोकियोला पोहोचली होती. पण आयोजकांनी मनिकाच्या खासगी प्रशिक्षकाला स्पर्धेच्या ठिकाणी येण्यास परवानगी दिली नाही. कोरोना प्रोटोकॉलमुळे ही परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे मनिका बत्राला राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक सौम्यदीप रॉय याच्या मार्गदर्शनात खेळावं लागले. तेव्हा तिने एका सामन्यात रॉय यांचा सल्ला ऐकला नाही. स्पर्धा संपल्यानंतर भारतीय टेबल टेनिस महासंघाने या विषयी मनिका बत्राला नोटीस बजावत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं.

मनिका बत्राने भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या नोटीसला उत्तर देताना म्हटलं की, मी सौम्यदीप रॉय यांची मदत घेण्यास नकार देत खेळाचे नुकसान केलेले नाही. ज्यांनी मॅच फिक्सिंगसाठी मला सांगितलं. ते जर प्रशिक्षकाच्या रुपाने माझ्यासोबत बसले असताना मी सामन्यावर कशी फोकस करू शकते?

मला मॅच फिक्स करण्यास सांगितलं

मनिका बत्राने टीटीएफआयचे सचिव अरूण बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे की, मी राष्ट्रीय प्रशिक्षकाविना खेळण्याच्या निर्णयामागे आणखी एक मोठं आणि गंभीर कारण आहे. मार्च 2021 दोहा येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत सामना गमावण्यासाठी प्रशिक्षकाने माझ्यावर दबाव निर्माण केला होता. ते त्यांची प्रशिक्षणार्थी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरावी यासाठी प्रयत्न करत होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्यांनी मला मॅच फिक्सिंगसाठी सांगितलं होतं.

ते माझ्या हॉटेलमधील खोलीत आले अन्...

माझ्याकडे याचे सर्व पुरावे आहेत. योग्य वेळी ते मी दाखवेन. सामन्यात पराभूत हो, हे सांगण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक माझ्या हॉटेलमधील खोलीत आले. त्यांनी माझ्यासोबत जवळपास 20 मिनिटे चर्चा केली. यात त्यांनी चूकीच्या पद्धतीने आपल्या प्रशिक्षणार्थीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी ती खेळाडू देखील त्यांच्यासोबत आली होती, असे देखील मनिका बत्राने सांगितलं.

...म्हणून माझ्या खेळावर परिणाम झाला

मी त्यांना त्यावेळी याविषयी कोणतेही वचन दिलं नाही. पण याविषयी मी टीटीएफआयला कल्पना दिली. त्यांच्या दबाव आणि धमकीचा माझ्या खेळावर परिणाम झाला, असेही मनिकाने सांगितलं.

दरम्यान, मनिका बत्राच्या गंभीर आरोपावर अरूण बनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आरोप सौम्यदीप रॉय यांच्यावर लावण्यात आले आहेत. त्यांनी यावर उत्तर दिल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

सौम्यदीप रॉय हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता खेळाडू आहेत. तसेच त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा -Tokyo Paralympics : भारताचा पदकतालिकेत डंका, पॅराऑलिम्पिकमधील सर्वोत्कृष्ठ कामगिरी

हेही वाचा -टोकियो पॅराऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यात भारतीय संघाची ध्वजवाहक असणार 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा

ABOUT THE AUTHOR

...view details