बासेल :भारतीय बॅडमिंटन खेळाडू एचएस प्रणॉयला रविवारी स्विस ओपन सुपर 300 ( Swiss Open Super 300 ) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रणॉयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचे ( Jonathan Christie of Indonesia ) आव्हान पेलता आले नाही. 48 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयला चौथ्या मानांकित खेळाडूकडून 12-21, 18-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय खेळाडू प्रणॉय पाच वर्षांत पहिल्यांजाच अंतिम सामना खेळत होता.
तिरुवनंतपुरममधील 29 वर्षीय खेळाडूला 2018 मध्ये 'गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स' रोग आणि कोविड-19 संसर्गामुळे अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागले. या स्पर्धेदरम्यान सुरेख फॉर्ममध्ये असलेल्या प्रणॉयला ( Badminton player HS Pranoy ) रविवारी जोनाथनच्या अचूकतेची आणि तग धरण्याची बरोबरी साधता आली नाही. प्रणॉयने सामन्याच्या सुरुवातीला जोनाथनला 5-5 आणि 8-8 अशी बरोबरी साधून झुंज दिली. मात्र, त्यानंतर जोनाथनने भारतीय खेळाडूला पहिल्या गेममध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. प्रणॉय चुका करत असताना जोनाथनने दबाव कायम ठेवला.