हॅमिल्टन : तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून सहा गडी राखून पराभूत झाल्यामुळे श्रीलंकेला पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग टेबलमधील आठव्या स्थानापासून वंचित राहावे लागले. या महत्त्वपूर्ण सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडच्या वेगवान आणि उसळीसमोर त्याचे फलंदाज झुंजताना दिसले. मॅट हेन्री (3/14), हेन्री शिपले (3/32) आणि डॅरिल मिशेल (3/32) यांनी प्रत्येकी तीन बळी घेत श्रीलंकेची फलंदाजी उद्ध्वस्त केली. श्रीलंकेचा संघ 41.3 षटकांत अवघ्या 157 धावांत गारद झाला.
न्यूझीलंडने पहिल्या सात षटकांत तीन विकेट गमावल्या :श्रीलंकेकडून केवळ पाथुम निसांका (57), दासून शनाका (31) आणि चमिका करुणारत्ने (24) यांनाच काहीशी झुंज देता आली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या सात षटकांत तीन विकेट गमावल्या. पण विल यंग आणि हेन्री निकोल्स यांनी शानदार खेळी खेळत न्यूझीलंडला सहा विकेट्सने विजय मिळवून दिला. यंगने नाबाद 86 तर निकोल्सने नाबाद 44 धावा केल्या. न्यूझीलंडने 32.5 षटकात चार विकेट गमावत 159 धावा करत सामना जिंकला. यंगला त्याच्या शानदार नाबाद ८६ धावांच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.