मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या मिश्र दुहेरीच्या विजेतेपदाचा सामना गमावल्यानंतर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला अश्रू अनावर झाले. सानिया आणि बोपण्णा जोडीला जेतेपदाच्या लढतीत स्टेफनी आणि माटोस या ब्राझीलच्या जोडीने पराभूत केले. या सामन्यात सानिया-बोपण्णा जोडीला ६-७(२) २-६ ने पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय जोडी अंतिम फेरीत पराभूत होऊन दुसऱ्या स्थानावर राहिली. अंति ग्रँडस्लॅममध्ये सानिया मिर्झाचा मुलगा इझानसोबत असल्याचे दिसून आले.
सहकारी खेळाडू रोहन बोपन्नाचा प्रवास :रोहन बोपण्णाने पराभवानंतर सानिया मिर्झाला तिच्या चमकदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, यादरम्यान सानियाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. बोपण्णा म्हणाला की, सानियाने देशातील तरुणांना विशेषतः मुलींना टेनिस खेळण्यासाठी प्रेरित केले आहे. बोपण्णा म्हणाला, 'सानियाचा भारताला अभिमान आहे कारण तिने नेहमीच भारताचा गौरव केला आहे.
सानियाने सर्वांच्या सहकार्याबद्दल मानले आभार :सानियाने भावनांवर ताबा मिळवत माईक हातात घेतला आणि सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. सानियानेही ब्राझीलच्या विजयी जोडीचे अभिनंदन केले. यानंतर ती म्हणाली, 'माझ्या व्यावसायिक करिअरची सुरुवात 2005 मध्ये मेलबर्नमधून झाली. आज ग्रँडस्लॅम कारकिर्दीला निरोप देण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. 36 वर्षीय सानियाने आधीच जाहीर केले होते की, पुढील महिन्यात दुबईत होणारी WTA स्पर्धा तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल.
सानियाची चमकदार कारकीर्द पाहा सानियाने तिच्या कारकिर्दीत सहा ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. ज्यात तीन महिला दुहेरी आणि तितक्याच मिश्र दुहेरी विजेतेपदांचा समावेश आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू आहे. सानिया आणि बोपण्णा या बिगरमानांकित जोडीला रॉड लेव्हर एरिना येथे अंतिम फेरीत लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
सानियाने रोहनचे मानले आभार : सानिया म्हणाली, 'हे आनंदाचे अश्रू आहेत. मला आणखी दोन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. बोपण्णाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सानिया म्हणाली, 'मिश्र दुहेरीत रोहन हा माझा पहिला जोडीदार होता. तेव्हा मी १४ वर्षांची होते आणि आम्ही राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. ही गोष्ट 22 वर्षांची आहे. तो माझा सर्वात चांगला मित्र आणि माझ्या सर्वोत्तम भागीदारांपैकी एक आहे. ४२ वर्षीय बोपण्णाने फ्रेंच ओपनच्या रूपाने मिश्र दुहेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.