पुणे - टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे मायदेशात स्वागत आणि सत्कार सुरू आहेत. देशासाठी ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा सन्मान, बक्षिस देऊन केला जात आहे. आता लवकरच त्याचे नाव एका स्टेडियमला देण्यात येण्याची शक्यता आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते एका स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव देण्याची शक्यता आहे. पुणे येथील डिफेंन्स इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्ड टेक्नॉलॉजी आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा सिंह दौरा करणार आहेत.
डिफेंन्सच्या पीआरओकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट परिसरातील स्टेडियमचे नाव 'नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे, छावणी' असे करण्यात येण्याची शक्यता आहे. प्रसिद्धी पत्रकानुसार, सिंह सर्विसेजच्या 16 ऑलिम्पिकपटूंचा सन्मान देखील करणार आहेत.