नवी दिल्ली - यंदाचा स्वातंत्र दिनाचा सोहळा खास असणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं जाणार आहे. यादरम्यान, मोदी खेळाडूंशी बोलणार आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, १५ ऑगस्टर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूतील सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहेत. ते प्रत्येक खेळाडूची भेट घेणार आहेत. तसेच त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 127 खेळाडूंचा चमू पाठवला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 2 पदकं जिंकली आहेत. तर भारताचे आणखी एक पदक निश्चित आहे. ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकत भारताचे पदकाचे खाते उघडले होते. त्यानंतर पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीत कांस्य पदक जिंकले. तर लवलिना बोर्गेोहेन हिचे बॉक्सिंगमध्ये पदक निश्चित आहे.