नवी दिल्ली -आगामी टोकियो ऑलिम्पिकमधील मशाल प्रकाशोत्सव सोहळा प्रेक्षकांविना आयोजित केला जाणार आहे. तब्बल ३५ वर्षानंतर प्रेक्षकांशिवाय हा कार्यक्रम होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रीस ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -२१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू
गुरुवारी अथेन्स येथील स्टेडियममधील समारंभासाठी देण्यात आलेल्या ओळखपत्रांना वैध मानले जाणार नाही, असेही समितीने म्हटले आहे. पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा याच स्टेडियममध्ये १८९६ साली खेळण्यात आल्या होत्या. पुढील सूचना येईपर्यंत त्यांचे कार्यालय सोमवारपासून बंद ठेवण्यात येईल, असेही समितीने म्हटले आहे. ग्रीसमध्ये आतापर्यंत ३३१ लोकांना लागण झाली आहे, तर चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या धोक्यामुळे फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल आदींच्या सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तसेच काही पुढे ढकलण्यात आले आहेत. जगभरात कोरोनाचा फैलाव वाऱ्यासारखा होत आहे. या विषाणूने १०० हून अधिक देश ग्रासले आहेत. तर ६ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोर्तुगालमध्ये २०० हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.