नवी दिल्ली - फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिलायन्सच्या 43 व्या व्हर्च्युअल सर्वसाधारण सभेत नीता अंबानी यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आणण्याचे माझे स्वप्न आहे. भारतीय क्रीडापटू जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी करताना मला पाहायचे आहे."
नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्य आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील रिलायन्स फाऊंडेशन लाखो मुलांसाठी शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबवत आहे. संचालक म्हणून त्या पहिल्यांदा रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करत होत्या. रिलायन्स फाऊंडेशनबद्दल त्या म्हणाल्या, ''गेल्या दहा वर्षांत या फाऊंडेशनने 3 कोटी 60 लाख लोकांचे जीवन बदलले आहे.''
नीता अंबानी यांनी भागधारकांना उद्देशून सांगितले, "कोरोनाचा उद्रेक होताना आम्ही मुंबईत अवघ्या दोन आठवड्यांत भारतातील पहिले 100 बेड्सचे विशेष कोरोना हॉस्पिटल सुरू केले. आमचे डॉक्टर आणि नर्स भारतीय नागरिकांची सेवा करण्याचा निःस्वार्थ व अथक प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा फैलाव होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पीपीई किटची कमतरता. आम्ही दररोज रेकॉर्ड टाइममध्ये सुमारे एक लाखापेक्षा अधिक पीपीई आणि एन 95 मास्क तयार केले. त्याच्या उत्पादन सुविधांमध्ये आवश्यक बदल केले. "
नीता अंबानी यांनी आश्वासन दिले, की जेव्हा कोरोना लस तयार होईल तेव्हा ती देशातील सर्व गरजूंना देण्यात रिलायन्स मदत करेल. मिशन अन्न सेवेचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या, “मिशन अन्न सेवेच्या माध्यमातून आम्ही देशातील अल्पभूधारक समाज, दैनंदिन वेतन मिळवणार्यांना आणि आघाडीच्या कामगारांना पाच कोटीहून अधिक जेवण उपलब्ध करून दिले आहे. मिशन अन्न सेवा हा जगातील कॉर्पोरेट फाऊंडेशनने हाती घेतलेला सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम ठरला आहे.''