मुंबई - टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने त्याचे दुसरे स्वप्नही पूर्ण केले आहे. टोकियोत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकण्याचे पहिले स्वप्न त्याने पूर्ण केले. त्यानंतर आता त्याने दुसरे स्पप्नही पूर्ण केले. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने स्वत:च माहिती दिली.
नीरज चोप्रा याने शनिवारी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. यात तो त्याच्या आई-वडिलांसह विमानामध्ये बसलेला दिसत आहे. हे फोटो पोस्ट करता नीरजने लिहलं की, 'आज आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले. आई-वडिलांना प्रथमच विमानातून प्रवास घडवतो आहे. तुमचा आशिर्वाद आणि शुभेच्छांचा मी नेहमी कृतज्ञ राहीन.'
दरम्यान, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.59 मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकमात्र सुवर्ण पदक आहे. तो अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिलाच खेळाडू आहे.