मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा तापाने फणफणला आहे. सुदैवानं त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण नीरजच्या आजाराचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले. त्याने भालाफेकमध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताचे हे टोकियो ऑलिम्पिकमधील एकमात्र सुवर्ण पदक ठरले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये अशी कामगिरी करणारा नीरज चोप्रा भारताचा पहिला खेळाडू ठरला. तसेच त्याची क्रमवारी देखील या कामगिरीने सुधारली. नीरज टोकियो ऑलिम्पिकपूर्वी क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर होता. पण सुवर्ण पदकाची जिंकल्यानंतर नीरजने थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
दरम्यान, सुवर्ण पदक जिंकल्यानंतर एका मुलाखतीत नीरज चोप्राने पदक जिंकल्यानंतरचा दुसरा दिवस अतिशय कठीण गेला होता. संपूर्ण शरीर दुखत होते असे सांगितले होते. भारतात परल्यानंतर नीरजचे जंगी स्वागत करण्यात आले. पण ऑलिम्पिकसाठीची तयारी आणि त्यानंतरचा व्याप यामुळे अतिताणामुळे नीरजला ताप आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.