पानिपत (हरियाणा) :बुडापेस्ट येथे जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटाकावलं. यासह जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला. या आधी नीरज चोप्रानं २०२० टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. या यशानंतर नीरजच्या गावातील ग्रामस्थ खूप आनंदी झाले आहेत.
पानिपत येथील निवासस्थानी उत्सव : नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरियाणातील त्याच्या गावात जल्लोषाचं वातावरण आहे. 'आपल्या देशासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. नीरज भारतात परत आल्यानंतर आम्ही आनंद साजरा करू', असं नीरजचे वडील सतीश कुमार म्हणाले. या क्षणी ते अभिमानाने भारावलेले दिसले. नीरज चोप्रानं नवा विक्रम केल्यानंतर हरियाणातील पानिपत येथील निवासस्थानी उत्सव सुरू झालाय.
क्रीडामंत्र्यांनी अभिनंदन केलं : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर जाऊन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं. 'हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासात कायमचा स्मरणात राहील', असं ते म्हणाले. नीरज चोप्राने पुन्हा एकदा करून दाखवले! 88.17 मीटर! भारतीय अॅथलेटिक्सच्या गोल्डन बॉयने बुडापेस्ट येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. यासह नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला अॅथलीट बनला. तुझ्या या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासात कायमचा स्मरणात राहील', असं अनुराग ठाकूर यांनी 'X' वर म्हटलयं.
भारतीय सैन्यानं देखील कौतुक केलं : भारतीय सैन्यानं देखील नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर त्याचं कौतुक केलंय. 'नीरज चोप्रानं पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली!' असं सैन्यानं 'X' वर पोस्ट करत म्हटलं. नीरज चोप्रा हा सैन्यात सुभेदार या पदावर आहे. अंतिम फेरीत नीरजनं पाकिस्तानच्या अर्शद नदीमला एका मीटरपेक्षा कमी अंतरानं पराभूत केलं. गतवर्षी रौप्यपदक पटकावल्यानंतर नीरजचं जागतिक चॅम्पियनशिपमधील हे दुसरं पदक आहे.
हेही वाचा :
- Neeraj Chopra News : नीरज चोप्राची ऐतिहासक कामगिरी, जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुर्वणपदक मिळविणारा ठरला पहिला भारतीय
- World Athletics Championships : पारुल चौधरीनं मोडला राष्ट्रीय विक्रम, पुरुष रिले संघ ५ व्या स्थानी