नवी दिल्ली - सहा वेळा विश्वविजेती महिला बॉक्सर एमसी मेरी कोम आणि निखत झरीन यांच्यामध्ये (५१ किलो वजनी गटासाठी) टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठी लढत होणार आहे. निखतने केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून ऑलिम्पिक मुष्टियुद्धात महिलांच्या ५१ किलो वजनी गटात आपली दावेदारी सांगितली. त्यामुळे अनुभवी मेरी आणि नवोदित निखत चाचणी लढतीत एकमेकींना भिडणार हे स्पष्ट झाले आहे.
मुष्टियुद्ध महासंघानेही (बीएफआय) या लढतीला मंजुरी दिली आहे. डिसेंबर महिन्यात निखत आणि मेरी कोम यांच्यातील ही चाचणी लढत होऊ शकते. या लढतीशिवाय महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील ऑलिम्पिक पात्रतेसाठी लोवलिना बोर्गोहेन हिलाही चाचणी लढत खेळावी लागणार आहे. याची माहिती बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिली.