नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावाला रोखण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेने विदेशातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. पण, भारताची स्टार महिला बॉक्सर आणि राज्यसभेची खारदार मेरी कोमने हा प्रोटोकॉल मोडल्याचे समोर आले आहे.
मेरी कोमने जॉर्डन येथे झालेल्या आशिया-ओशिनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर ती भारतात परतताना आपण कोरोनामुळे १४ दिवस घरी राहणार असल्याचे सांगितले होते. पण तिने हा प्रोटोकॉल मोडत १८ मार्च रोजी राष्ट्रपती भवनात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला हजेरी लावली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून चहापानाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यात मेरी कोम दिसून येत आहे. या फोटोत कोरोना पॉझिटिव्ह बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेले भाजपचे खासदार दुष्यंत सिंगही आहेत.
दरम्यान, मेरी कॉमने प्रोटोकॉल तोडल्याचे मान्य केलं असून तिने, मी जॉर्डनहून परत आल्यापासून घरी आहे. फक्त राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात गेले होते. मात्र मी त्या कार्यक्रमात दुष्यंत सिंह यांना भेटले नाही किंवा हातही मिळवला नाही. सध्या मी क्वारंटाईनमध्येच असून पुढचे काही दिवस घरीच थांबणार असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकार कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे, तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचेही आवाहन करत आहे. अशात मेरी कोमने प्रोटोकॉल मोडल्याने, तिच्यावर टीका केली जात आहे.