नवी दिल्ली - भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिला दोहा येथे 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. तिने सोनिपत येथे झालेल्या राष्ट्रीय शिबीरात सहभाग नोंदवला नव्हता. यामुळे तिला भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे.
मनिका बत्राच्या अनुपस्थितीत सुतिर्था मुखर्जी भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात अहिका मुखर्जी आणि अर्चना कामत यांना स्थान मिळाले आहे.
पुरूष गटात अनुभवी शरथ कमल, जी साथियान, हरमीत देसाई, मानव ठक्कर आणि सानिल शेट्टी या खेळाडूंवर भारताची भिस्त आहे.
चीनचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार नाहीत. यामुळे भारतीय पुरूष संघाच्या विजयासाठी आशा वाढल्या आहेत. एकेरी आणि दुहेरी या दोन्ही गटात ही स्पर्धा होणार आहे.
भारतीय टेबल टेनिस महासंघाने याआधीच स्पष्ट केले होते की, राष्ट्रीय शिबीरात भाग न घेणाऱ्या खेळाडूंना निवडले जाणार नाही. आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यानंतर टीटीएफआयच्या वेबसाईटवर खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.
टोकियो ऑलिम्पिकनंतर सर्व खेळाडूंना शिबीर बंधनकारक करण्यात आले आहे. पण मनिकाने, आपल्या खासगी प्रशिक्षकासोबत ती पुण्यात प्रशिक्षण करत असल्याचे महासंघाला कळवले होते. दुसरीकडे जी साथियान, देसाई आणि सुतीर्था वेगवेगळ्या कारणामुळे राष्ट्रीय शिबिरात उशिरा सहभागी झाले होते. पण त्यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, मनिकाने, खेलरत्न पुरस्कार प्राप्त नॅशनल प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रॉय यांनी मला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा पात्रता फेरीतील एक सामना गमावण्यास सांगितल्याचा आरोप तिने केला आहे. यावर महासंघाने एक समिती गठीत करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
- भारतीय पुरूष संघ - मानव ठक्कर, शरथ कमल, जी साथियान, हरमीत देसाई, सानिल शेट्टी
- पुरूष डबल्स - शरथ कमल आणि जी साथियान, मानव ठक्कर आणि हरमीत देसाई
- महिला संघ - सुतिर्था मुखर्जी, अहिका मुखर्जी, अर्चना कामत, श्रीजा अकुला
- महिला डबल्स - अर्चना कामत आणि श्रीजा अकुला, सुतिर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी
- मिश्र दुहेरी - मानव ठक्कर आणि अर्चना कामत, हरमीत देसाई आणि श्रीजा अकुला.
हेही वाचा -ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कची क्रिकेटर पत्नी एलिसा हिलीची रोहित शर्मावर नजर
हेही वाचा -ICC T20 Rankings: विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा, क्विंटन डी कॉकची मोठी झेप