नवी दिल्ली -भारताचा युवा टेबल टेनिसपटू मानव ठक्करने २१ वर्षांखालील जागतिक क्रमवारीत मोठा इतिहास घडवला. या क्रमवारीत युवा खेळाडू मानवने प्रथम क्रमांक मिळवला आहे. आयटीटीएफ चॅलेंज प्लस कॅनडा ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर मानवने हे स्थान मिळवले आहे. मानव डिसेंबरमध्ये दहाव्या क्रमांकावर होता.
हेही वाचा -रणजी ट्रॉफी : मुंबईचा १९४ धावांत खुर्दा, सूर्यकुमारची एकाकी झुंज
२१ वर्षांखालील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा मानव पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. मानव ठक्करने रविवारी आयटीटीएफ चॅलेंज प्लस बेनेक्स व्हिगो नॉर्थ अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. दुसर्या मानांकित मानवने पुरुषांच्या अंडर -२१ प्रकारात अर्जेंटिनाच्या मार्टिन बेंटनकोरला ११-३, ११-५, ११-६ असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. तर, भारताची अव्वल महिला खेळाडू मानिका बत्राने ६१ वे स्थान कायम ठेवले.
नुकत्याच जाहीर झालेल्या या क्रमवारीत भारताचा टेबल टेनिसपटू गुणस्वरन सथियानने ३० वे स्थान कायम राखले. तर, अचंता शरथ कमलने क्रमवारीत सुधारणा करत ३३ वे स्थान मिळवले आहे.