महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वाचा...आसामच्या या 'सुसाट' पोरीचा थक्क करणारा प्रवास!

भारताची वेगवान धावपटू आणि 'ढिंग एक्सप्रेस' अशी ओळख बनवलेल्या हिमा दासने मागील 20 दिवसांत तब्बल 5 सुवर्णपदके नावावर केली आहेत.

हिमा दास

By

Published : Jul 21, 2019, 2:05 PM IST

Updated : Jul 21, 2019, 3:21 PM IST

नवी दिल्ली -एकीकडे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला बाहेर ढकलले गेले आणि दुसरीकडे आसामच्या एका 19 वर्षीय मुलीने भारताचे नाव जगात उंचावले. भारताची वेगवान धावपटू आणि 'ढिंग एक्सप्रेस' अशी ओळख बनवलेल्या हिमा दासने मागील 20 दिवसांत तब्बल 5 सुवर्णपदके नावावर केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी करणाऱ्या हिमाने अत्यंत खडतर परिश्रम घेत आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवले.

सुरुवातीचे आयुष्य

आसामच्या नागाव जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात हिमाचा जन्म झाला. तिचे आई-वडील भातशेती करतात. आई-वडील आणि ही चार मुले यांचा उदरनिर्वाह संपूर्ण शेतीवर अवलंबून. पण, या संघर्षातून वाट काढत हिमा प्रकाशझोतात आली. भारताच्या पूर्वेकडील राज्यात फुटबॉल हा लोकप्रिय खेळ खेळला जातो. हिमालाही लहानपणी या खेळाची आवड जडली होती. गावात असणाऱ्या भाताच्या शेतात ती फुटबॉल खेळायची. हाच खेळ खेळताना हिमाच्या शिक्षकांनी तिला पाहिले. काटक शरीरयष्टीच्या हिमामध्ये एवढी चपळता पाहून तिचे शिक्षकही थक्क झाले.

गुरुंनी दिला कानमंत्र

हिमाला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पण, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारिरीक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.

आसाममधील पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात

नुकताच ब्रम्हपुत्रा नदीला पूर आल्याने आसाममधील ३० जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. या संकटात सापडलेल्या लोकांना आधार देण्यासाठी हिमाने आपला अर्धा पगार देण्याचे जाहीर केले. तिने मदतीची रक्कम मुख्यमंत्री मदत फंडामध्ये जमा केली आहे. शिवाय, मोठ्या कंपन्या तसेच नागरिकांना आसामला मदत करा, असे आवाहनही हिमाने केले आहे.

एकाच खेळाने झपाटलेल्या भारताला आज हिमाने स्वत: ची ओळख करून दिली आहे. इतक्या कमी वयात हिमाने मिळवलेली पदके पाहून लोकांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. येत्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने अशीच चमकदार कामगिरी करावी, अशी आशा सर्वजण व्यक्त करत आहेत.

Last Updated : Jul 21, 2019, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details