नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन कसोटी सामने जिंकून भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. नागपूर कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 132 धावांनी आणि एका डावाने पराभव केला. त्याचवेळी दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने सहा गडी राखून विजय मिळवला आहे. भारतीय संघाने दोन सामने जिंकले असले, तरी या दोन्ही सामन्यांत केएल राहुल सलामीवीर फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला आहे.
दोघांवरसुद्धा कारवाईची टांगती तलवार :केएल राहुल व्यतिरिक्त, मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण करणारा केएस भरतदेखील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये आपले कौशल्य दाखवू शकला नाही. खराब कामगिरीमुळे दोघांवरही टांगती तलवार आहे. राहुलच्या खराब कामगिरीमुळे बीसीसीआयने त्याचे उपकर्णधारपद काढून घेतले आहे. त्याच्या जागी फलंदाज शुभमन गिल आणि यष्टीरक्षक इशान किशनला पुढील कसोटीत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केएल राहुलची कामगिरी :केएल राहुलने दोन सामन्यांत 38 धावा केल्या. 47 कसोटी सामने खेळलेल्या राहुलने मागील दोन सामन्यांच्या तीन डावांत फक्त 38 धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात राहुल 20 धावा करून बाद झाला. त्याने 71 चेंडूंचा सामना केला. राहुलने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात 1 धावा केल्या. फिरकी गोलंदाजांसमोर राहुल असाहाय्य दिसत होता. त्याला दोनदा नॅथन लायनने आणि एकदा टॉड मर्फीने बाद केले.