बंगळुरू:ऑलिम्पियन जलतरणपटू श्रीहरी नटराजने गुरुवारी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (Khelo India University Games) मध्ये तीन सुवर्णपदके जिंकली. ज्यामुळे यजमान जैन विद्यापीठाने 14 सुवर्ण पदकांसह जलतरण तलावावर वर्चस्व राखले. जैन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नटराजने 100 मीटर फ्रीस्टाईल, 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 4x200 मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. या सर्व स्पर्धांमध्ये त्याने नवे विक्रमही केले आहेत.
नटराजने 50.98 सेकंदांचा वेळ नोंदवून रुद्रांश मिश्राने 2020 मध्ये 100 मीटर फ्रीस्टाइलमधील 53.01 चा विक्रम मोडला. हीर शाह (मुंबई विद्यापीठ) यांनी 52.78 सेकंद आणि आदित्य दिनेश (अण्णा विद्यापीठ) यांनी 52.79 सेकंदांची वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. नटराजने 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये ( 50m backstroke ) 26.10 सेकंदाची वेळ नोंदवली. शिव श्रीधर (जैन विद्यापीठ) यांनी 27.10 सेकंद आणि सिद्धांत सेजवाल (पंजाब विद्यापीठ) यांनी 27.69 सेकंदात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
यानंतर नटराजने संजय जयकृष्णन, शिव श्रीधर आणि राज रेळेकर यांच्यासोबत 4x200 मीटर फ्रीस्टाइल रिले ( 4x200m freestyle relay ) आठ मिनिटे 06.87 सेकंदाच्या नवीन विक्रमी वेळेसह पूर्ण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 8: 22.17 सेकंद वेळेसह रौप्यपदक पटकावले. तर मुंबई विद्यापीठाने 8: 28.57 सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले.