महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

खेलो इंडिया युथ गेम्स २०२० : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्र 'किंग' - खेलो इंडिया गेम्समध्ये महाराष्ट्राला जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वसाधारण विजेतेपद

आसामच्या गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी, जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या रिचा चोरडियाने हूप व चेंडू प्रकारात ब्राँझपदक जिंकले. अनन्या सोमणने रिबनमध्ये रौप्यपदक तर क्लब प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली.

khelo india youth games 2020 : maharashtra won championship gymnastics
खेलो इंडिया युथ गेम्स २०२० : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्र 'किंग'

By

Published : Jan 15, 2020, 8:01 AM IST

गुवाहाटी- खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने जिम्नॅस्टिक्समध्ये एकूण ४० पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या क्रीडा प्रकारात, शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या आदिती दांडेकर हिने २१ वर्षाखालील रिदमिक विभागात हूप व क्लब प्रकारात सोनेरी कामगिरी केली. तिला चेंडू प्रकारात रौप्यपदक तर रिबन प्रकारात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

आसामच्या गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी, जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या रिचा चोरडियाने हूप व चेंडू प्रकारात ब्राँझपदक जिंकले. अनन्या सोमणने रिबनमध्ये रौप्यपदक तर क्लब प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली.

वैदेही देऊळकर हिला व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक मिळाले. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात श्रेयस चौधरी याने हॉरिझॉन्टल बार प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याचा सहकारी ओंकार शिंदे याला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, याआधी जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या अस्मी बडदेने जबरदस्त कामगिरी केली. तिने या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात ४ सुवर्णपदकांची कमाई केली. तिने सुरूवातीला रिदमिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तिने शनिवारी चेंडू, दोरी व रिबन प्रकारातील सुवर्णपदकांची भर घातली.

क्लब रँक प्रकारात मात्र, अस्मीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात महाराष्ट्राच्याच श्रेया बंगाळे हिने तिला मागे टाकून सोनेरी कामगिरी केली. श्रेयाने दोरी प्रकारात रौप्यपदक तर चेंडू प्रकारात ब्राँझपदक पटकाविले. मुलांच्या समांतर बार प्रकारात १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या ओंकार धनावडेने रौप्य पदक जिंकले. तर आर्यन नहातेने ब्राँझ पदकाची कमाई केली आहे.

जिम्नॅस्टिक्स खेळात महाराष्ट्राने एकूण १० सुवर्ण, १२ रौप्य आणि १८ ब्राँझ पदके जिंकली आहेत. या प्रकारात महाराष्ट्राने पदक जिंकण्यामध्ये अव्वलस्थान काबीज केले. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. उत्तर प्रदेशने या प्रकारात एकूण १८ पदके जिंकली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details