टोकियो : भारोत्तोलन आणि मुष्टीयुद्ध संघटनेसोबत विविध प्रलंबित मुद्द्यांवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला ऑलिम्पिकमधून एखादा खेळ वगळण्याचे अधिकार आता मिळाले आहेत. यामुळे येत्या 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिकमधून भारोत्तोलन हा क्रीडा प्रकार वगळला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास हा जगभरातील भारोत्तोलनपटूंसाठी मोठा धक्का असेल असे बोलले जात आहे.
आयओसीला मिळाले नवे अधिकार
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अर्थात आयओसीला मतदानातून हे नवे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. याद्वारे आयओसी सदस्यांच्या सहमतीने ऑलिम्पिकमधून एखादा क्रीडा प्रकार वगळण्याचे अधिकार समितीला मिळाले आहेत. जर एखाद्या क्रीडा प्रकाराच्या नियामक मंडळाने आयओसीच्या निर्णयाचे किंवा नियमांचे पालन केले नाही किंवा ऑलिम्पिकच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे कृत्य केल्यास तो क्रीडा प्रकार आयओसी सदस्यांच्या सहमतीने ऑलिम्पिकमधून वगळला जाऊ शकतो. आयओसीचे उपाध्यक्ष जॉन कोटस यांनी या नव्या नियमांची गरज आयओसी सदस्यांसमोर व्यक्त केली होती. जॉन कोटस हे ऑलिम्पिकच्या कायदेशीर आयोगाचे प्रमुख असून आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाश यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
भारोत्तोलनावर टांगती तलवार
या नव्या नियमांमुळे भारोत्तोलन हा क्रीडाप्रकार पॅरिस ऑलिम्पिकमधून वगळला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. डोपिंगची प्रकरणे, प्रशासकीय अनागोंदी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भारोत्तोलनावर ऑलिम्पिकमधून वगळले जाण्याची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आयओसीचे माजी सदस्य टॅम्स अज्न हे आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन फेडरेशनेचे सुमारे दोन दशके प्रमुख राहिले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत ते आयडब्ल्युएफचे प्रमुख होते.