दोहा -माजी विश्व चॅम्पियन आणि भारताची आघाडीची नेमबाजपटू तेजस्विनी सावंतने आगामी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. सध्या सुरू असलेल्या १४ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तेजस्विनीने महिलांच्या ५० मीटर ३ पोजिशन रायफल प्रकारात चांगली कामगिरी केली.
हेही वाचा -भारताचे संदीप, सुमित टोकियो पॅरालिम्पिकसाठी ठरले पात्र
तेजस्विनीने ११७१ गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आणि सोबतच पाचवे स्थान पटकावत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटही मिळविले. टोकियो ऑलिम्पिकसाठी नेमबाजीत प्रवेश घेणारी तेजस्विनी १२ वी खेळाडू आहे. यापूर्वी, चिंकी यादवने नेमबाजीत भारताला 11 वा ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला.
२५ मीटर पिस्तूल स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या चिंकीने अंतिम सामन्यात रौप्यपदक जिंकले आणि पुढच्या वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही मिळवले. तिने एकूण ५८८ गुण मिळवत अंतिम सामन्यात २९६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. थायलंडच्या नापहास्वान यांगुपेनबूने २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. यांगुपेनबूनेला ५९० गुण मिळाले.