मुंबई - क्रोएशियाच्या ओसीजेकमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताची मराठमोळी नेमबाज राही सरनोबत हिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. राहीने २५ मीटर एअर पिस्तल प्रकारात हे सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत राही ४० पैकी ३९ पाईंट्स घेण्यात यशस्वी ठरली.
३० वर्षीय राहीने एकूण ५९१ पाईंट्ससह दुसरे स्थान काबिज केले होते. परंतु अंतिम फेरीत तिने शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिसरी, चौथी, आणि सहाव्या सिरिजमध्ये तिने पाईंट्स घेत सुवर्णपदक जिंकले. फ्रान्सची मथिल्डे लामोले रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. अंतिम फेरीत तिने ३१ पाईंट्स घेतले. रशियाची विन्टालिना २८ गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली.
भारताची मनू भाकर हिला अंतिम फेरीत खास कामगिरी करता आली नाही. तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे नेमबाजी विश्वचषकामध्ये १० मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात सौरभ चौधरी आणि मनू भाकर या भारतीय जोडीने रौप्य पदक जिंकले आहे.