बँकॉक -अतानू दासच्या नेतृत्वाखाली भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तीन कांस्यपदके जिंकली, तर तीन रौप्यपदके निश्चित केली. आर्चरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या निलंबनामुळे भारताचे खेळाडू वर्ल्ड आर्चरी असोसिएशनच्या ध्वजाखाली खेळत आहेत.
हेही वाचा -सायना नेहवालवर कारवाई करा!...चाहत्यांनी केली मागणी
कोरियाच्या जिन हायेक ओहला ६-५ ने मात देत दासने प्रथम वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. सोमवारी मिश्र रिकर्व गटात दीपिका कुमारीसोबत कांस्यपदक जिंकल्यानंतर, पुरूषांच्या रिकर्व गटातही पदक मिळवून दासने कांस्यपदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. दीपिका कुमारी, लेशराम बॉम्बायला देवी आणि अंकिता भक्ता यांच्या रिकर्व्ह महिला संघाने जपानला ५-१ असे हरवून कांस्यपदक जिंकले. यापूर्वी उपांत्य फेरीत भारतीय संघाला कोरियाने २-६ ने पराभूत केले होते.
कंपाउंड क्लासच्या अंतिम सामन्यात तीन तिरंदाजांची धडक -
भारताचे तीन तिरंदाज कंपाउंड क्लासच्या अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. बुधवारी हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज यांच्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत इराणला २२९ -२२१ ने पराभूत केले. अंतिम फेरीत त्यांचा सामना कोरियाशी होणार आहे.