दोहा -विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या मिश्र रिले संघाने सातवे स्थान राखले आहे. ४X४०० मीटर रिले स्पर्धेत भारताच्या मोहम्मद अनास, वेलुवा कारथ विस्मया, जिसना मॅथ्यू आणि नोग निर्मल टॉम या चार खेळाडूंच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
हेही वाचा -टेनिस : सुमित नागलने केला भीमपराक्रम, विदेशी मैदानावर जिंकला पहिलाच किताब
या स्पर्धेत अमेरिकेच्या संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. ३:९:३४ सेकंदाची वेळ नोंदवत अमेरिकेने विश्व विक्रम केला आहे. तर, रौप्य पदक पटकावणाऱ्या जमैकाच्या संघाने ३:११:७८ सेकंदाची वेळ नोंदवली आहे. बपरिन संघाने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
भारतीय रिले संघाने ३:१५:७७ सेकंदाची वेळ नोंदवली. रेसच्या सुरुवातीला मोहम्मद अनासने चांगले प्रदर्शन केले होते. मात्र, त्यानंतर विस्मया आणि जिसना यांच्यात गोंधळ उडाला. त्यामुळे भारताला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
याआधी भारताची महिला धावपटू द्युती चंद पहिल्या फेरीत गारद झाली. या स्पर्धेत द्युतीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत द्युती ४७ खेळाडूंमध्ये ३७ व्या स्थानावर राहिली.