नवी दिल्ली:आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय हॉकी संघाच्या या विजयावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे. जय शाह यांनी ट्विट करत भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले. भारतीय संघाने एक उल्लेखनीय विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
भारताचा विजय: चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानच्या संघात हॉकीचा सामना झाला. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगने केले. भारतीय संघाने सामन्याची सुरुवातीपासून पाकिस्तानच्या संघावर दबाव ठेवला होता. भारताकडून हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले तर जुगराज सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताने 4-0 असा पाकिस्तानचा पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांतून 13 गुणांसह आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्याबद्दल @TheHockeyIndia चे अभिनंदन! निष्ठा आणि कौशल्य खरोखर प्रेरणादायी होते. 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी संघाला हार्दिक शुभेच्छा. विजय मिळवूया.
पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर: भारताने या विजयासह आशियाई चॅम्पियन ट्रॉफीची उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर तीन वेळा आशियाई चॅम्पियन ट्रॉफी मिळवलेल्या पाकिस्तान संघाचा या स्पर्धेतील प्रवास संपला. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गोलने पराभव टाळणे आवश्यक होते. उपांत्य फेरीत आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला पराभव टाळणे किंवा सामना ड्रा करणे आवश्यक होते. दरम्यान पाकिस्तान संघ फक्त तीन मिनीटे भारतीय संघाला जबरदस्त टक्कर देऊ शकला. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघावर दबाव टाकला. खेळाच्या शेवटपर्यंत भारताने त्यांचावरील दबाव कायम ठेवला.