नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसोबत चहापान केला. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हे चहापान झाले. याची माहिती राष्ट्रपती भवनकडून ट्विट करत देण्यात आली. या चहापान कार्यक्रमाला खेळाडूंसोबत टोकियोला गेलेले त्यांचे प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टापला सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते.
या चहापान कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद बोलताना म्हणाले की, तुम्ही विजयानंतर विनम्रता आणि पराभव संयमाने स्वीकारला, याचा मला आनंद आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 130 करोड भारतीय तुमच्या यशासाठी प्रार्थना करत होते. ते संपूर्ण उत्साहात तुमचे समर्थन करत होते.
आम्हाला आमच्या मुलींवर खूप अभिमान आहे, ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करत जागतिक स्तरावर आपली छाप सोडली. कोरोना महामागीत तुम्ही जल्लोष साजरा करण्याची संधी दिली. जेव्हा तुम्ही कोणत्याही खेळात भाग घेता, यात तुम्ही कधी जिंकता तर कधी पराभूत होता. परंतु प्रत्येक वेळी नवी गोष्ट शिकण्यास मिळते, असे देखील रामनाथ कोविंद म्हणाले.