चेन्नई : भारत आणि मलेशिया यांच्यात खेळल्या गेलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला मलेशियाने शानदार खेळ केला. हाफ टाइमपर्यंत मलेशिया भारतापेक्षा 3-1 ने पुढे होता. मात्र तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला दोन शानदार गोल करत भारताने गेममध्ये पुनरागमन करत स्कोअर 3-3 असा बरोबरीत आणला. त्यानंतर चौथ्या हाफमध्ये आकाशदीप सिंगच्या शानदार गोलच्या बळावर भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव करत विक्रमी चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या सामन्यातील पराभवामुळे मलेशियाचे प्रथमच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
भारत हाफ टाइमपर्यंत 1-3 ने मागे होता : हाफ टाइमपर्यंत भारत 1-3 ने पिछाडीवर होता. भारताचा एकमेव गोल जुगराज सिंगने 9 व्या मिनिटाला केला. तर मलेशियाकडून अझराई अबू कमाल याने 14 व्या मिनिटाला, रहीम राझीने 18 व्या मिनिटाला आणि मुहम्मद अमिनुदीनने 28 व्या मिनिटाला गोल केले. मलेशियाने हाफ टाईमपर्यंत अतिशय आक्रमक खेळ दाखवला. त्यांनी भारतीय संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते.
भारताने पुनरागमन केले :तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या 1 मिनिटात भारताने दोन गोल करत गेम 3-3 असा बरोबरीत आणला. 44 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्यावर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने शानदार गोल करत स्कोअर 2-3 असा केला. त्यानंतर काही सेकंदांनी गुरजंत सिंगने मैदानी गोल करत स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला. भारताचा स्टार खेळाडू आकाशदीप सिंगने चौथा गोल केला. या गोलसह भारताने मलेशियावर 4-3 अशी आघाडी घेतली, जी भारताने पूर्ण वेळेपर्यंत कायम राखली.
भारताने विक्रमी चौथ्यांदा जेतेपद पटकावले : या विजयासह भारताने विक्रमी चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानने ही ट्रॉफी 3-3 वेळा जिंकली होती. मलेशियाच्या संघाने उपांत्य फेरी-1 मध्ये दक्षिण कोरियाचा 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तर भारतीय संघाने उपांत्य फेरी -2 मध्ये जपानचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.
हेही वाचा :
- Virat Kohli : 'मी एवढाही श्रीमंत नाही', जाणून घ्या कमाईच्या वृत्तांबद्दल काय म्हणाला विराट कोहली
- SRH New Head Coach : सनरायझर्सला मिळाले नवे हेड कोच, न्यूझीलंडच्या 'या' दिग्गज खेळाडूची नियुक्ती
- Sachin Tendulkar : क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! पुन्हा एकदा रंगणार सचिन विरुद्ध अख्तर सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे