नवी दिल्ली :विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला काही दिवसात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी क्रिकेटपटूंना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना आपण तंदुरुस्त असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. त्यासाठी विविध चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती बीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( NCA ) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) वैद्यकीय पथकाकडून वेळोवेळी या खेळाडूंच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. मात्र यावर्षी विश्वचषक असल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) कोणताही धोका पत्करायला तयार नसल्याचं या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
खेळाडूंना पार कराव्या लागणार 'या' चाचण्या :भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी नुकतीच आयर्लंडमध्ये टी20 मालिका खेळली आहे. आयर्लंडमध्ये खेळलेल्या खेळाडूंना ही चाचणी करण्याची गरज नाही. मात्र बहुतेक खेळाडूंना फिटनेस चाचणी देणं बंधनकारक असेल. त्यांना रक्त चाचणीही करणं गरजेचं आहे. खेळाडूंच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले सगळे पॅरामीटर्स तपासले जातील. यात लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखर, यूरिक ऍसिड, कॅल्शियम, जीवनसत्त्वे B12 आणि डी, क्रिएटिनिन, टेस्टोस्टेरॉन आदींचा समावेश आहे. काहीवेळा DEXA चाचणी देखील करण्यात येते. खेळाडूंच्या हाडांची घनता तपासण्यासाठी ही चाचणी वापरली जाते.