भुवनेश्वर : हॉकी विश्वचषकात आज पूल अ आणि पूल ब संघांमध्ये सामने होणार आहेत. दिवसाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार असून दुसरा सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर येथे दुपारी 3 वाजता होईल. बेल्जियम आणि जपान यांच्यातील तिसरा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. तर दिवसाचा शेवटचा सामना दक्षिण कोरिया आणि जर्मनी यांच्यात संध्याकाळी 7 वाजता बिरसा मुंडा स्टेडियमवर होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड :ऑस्ट्रेलियाचा हॉकी संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 15 व्या क्रमांकावर आहे. या दोघ संघांमध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले असून त्यापैकी ऑस्ट्रेलियाने आठ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. विश्वचषकात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये यांच्यात पहिल्यांदा सामना झाला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 12-0 ने पराभव केला होता.
ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला : तीन वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने हॉकी विश्वचषकातील शेवटच्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. 13 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा 8-0 असा धुव्वा उडवला तर त्यांचा अर्जेंटिनासोबतचा दुसरा सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका त्यांचे दोन्ही सामने गमावल्यानंतर अ गटात तळाशी आहे.