मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टोकियो ऑलिम्पिक दरम्यान, भारतीय अॅथलिटचे मनोबल वाढवले. त्याने पदक जिंकणाऱ्या अॅथलिटना शुभेच्छा ही दिल्या. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक जिंकून देणारी महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने आज बुधवारी सचिन तेंडुलकरची भेट घेतली. यादरम्यान, मीराबाई चानूने तिने जिंकलेले रौप्य पदक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दाखवला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाचे शतक करणारा एकमात्र फलंदाज सचिन तेंडुलकर नेहमी इतर खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देतो. ऑलिम्पिक दरम्यान सचिन अॅथलिटचे सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळांडूचे मनोबल वाढवताना पाहायला मिळाला. मीराबाई चानूने महिला 49 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकलं. मीराबाई विश्व चॅम्पियनमध्ये सुवर्ण पदक विजेती आहे. याशिवाय तिच्या नावे राष्ट्रकुल स्पर्धेत देखील एक सुवर्ण पदक आहे.
मीराबाई चानूने सचिनची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे दोन फोटो मीराबाई चानूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. ती तिच्या पोस्टमध्ये म्हणते की, सकाळी सचिन तेंडुलकर सरची भेट घेऊन खूप छान वाटलं. त्यांच्या सोबतचे संभाषण माझ्यासोबत नेहमी आठवणीत राहिल. त्यांची भेट घेऊन मी प्रेरीत झाली आहे.