नवी दिल्ली - कॉमनवेल्थ गेम्स २०१० मध्ये भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या गीता फोगटच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. गीताने मंगळवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी गीताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची दिली. कुस्तीपटू गीता फोगटने पवन कुमार याच्याशी २०१६ मध्ये लग्न केले.
गीता फोगटने पती पवन कुमारसह आपल्या बाळाचा फोटो शेअर केला आहे. गीता फोगटने फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहले आहे की, 'हॅलो बॉय !! या जगात तुझे स्वागत आहे. तो आला आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्हीही प्रेम आणि आशीर्वाद द्या. घरी आलेल्या नव्या पाहुण्याने आमचे जीवन परफेक्ट केले आहे. हा आनंदाचा क्षण मला शब्दात सांगता येणार नाही.'