नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यात चर्चा झाल्यानंतर यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढलेल्या घटनांमुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा -कोलकाता 'लॉकडाऊन' पाहून दादा झाला भावूक
ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी १९१६, १९४० आणि १९४४ मध्ये ही मानाची स्पर्धा जागतिक महायुद्धांमुळे रद्द करण्यात आली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी होणार असली तरी, या स्पर्धेला 'टोकियो २०२०' नावानेच ओळखले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे फुटबॉल, टेनिस, क्रिकेट, बास्केटबॉल असो की, हॉकी सर्व खेळाच्या स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकवरही कोरोनाचे सावट होते. यामुळे जागतिक खेळाडू संघटनने ऑलिम्पिक पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. तर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या धोक्यामुळे आपले खेळाडू ऑलिम्पिकसाठी जपानला पाठवणार नसल्याचे सांगितले होते. या कारणाने, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेवर दडपण वाढले होते.