रत्नागिरी- जिल्ह्यातील 'डेरवण युथ गेम्स' या क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा १२ मार्चपर्यंत डेरवण येथे रंगणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू डॉ. अतुल बिनीवाले आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जिम्नॅस्टिक मधुरा तांबे यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या वतीने, शिवजयंतीच्या निमित्तानं एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे सहावे वर्ष आहे.
या खेळांचा आहे समावेश -
यावर्षी अॅथलेटीक्स, नेमबाजी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, कॅरम, बुद्धिबळ, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, जलतरण, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, वॉल क्लायम्बिंग, योग या खेळांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे.
डेरवण युथ गेम्सची माहिती देताना अजित गालवणकर... ८ ते १८ या वयोगटातील खेळाडू यात सहभागी झाले आहेत. आत्तापर्यंत चार हजाराहून अधिक खेळाडूंची नोंदणी झाली आहे. या स्पर्धा दोन सत्रात होणार असुन, संध्याकाळी विद्युत प्रकाशात या स्पर्धा पार पडणार आहेत.
यंदा फुटबॉल या खेळात प्रथमच महिला संघांनी सहभाग नोंदवला आहे. या युथ गेम्सच्या निमित्ताने देशभरातील अनेक खेळाडूंचा या ठिकाणी सहभाग होत आहेत. यामुळे अनेक नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी कोकण वासियांना मिळली आहे.