नवी दिल्ली - गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहीत बॉक्सिंग प्रशिक्षकाने १९ वर्षीय महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संदीप मलिक असे प्रशिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
हरियाणाचा रहिवाशी असलेला २८ वर्षीय संदीप मलिक आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व केलेला आहे. तसेच तो बॉक्सिंग प्रशिक्षक असून त्यासोबत बॉक्सिंग अकॅडमीही चालवतो. त्याच्यावर एका १९ वर्षीय महिला खेळाडूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संदीप याला सोनीपतमधून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने त्याच्यावरील आरोप मान्य केले आहेत.
काय आहे प्रकरण -
संदीपच्या मार्गदर्शनाखाली हरियाणाचा संघ पश्चिम बंगालमध्ये आयोजित क्लासिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा खेळण्यासाठी गेले होते. ही स्पर्धा २९ फेब्रुवारी ते ३ मार्च या दरम्यान पार पडली. या स्पर्धेसाठी संघ २७ फेब्रुवारीला नवी दिल्लीतून दुरंतो एक्स्प्रेसने बंगालसाठी रवाना झाला. या रेल्वे प्रवासादरम्यान आणि कोलकातामध्ये संदीपने महिला खेळाडूचे शोषण केले.
पीडित महिला खेळाडूने कोलकातामधून परत येताच दिल्ली रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी संदीपवर गुन्हा दाखल करत अटक केली. महत्वाची बाब म्हणजे, संदीप विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत.
हेही वाचा -महाराष्ट्राच्या खेळाडूला हरवत पंकजने जिंकले ३४वे राष्ट्रीय जेतेपद
हेही वाचा -दहा वर्षाचा दुष्काळ संपवत अचंता शरथ कमलने जिंकली ओमान ओपन स्पर्धा