दुबई - येथे पहिल्यादांच आयोजित करण्यात आलेल्या आशियाई युवा आणि ज्यूनियर बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे दमदार प्रदर्शन जारी आहे. भारताने युवा गटात 10व्या दिवसांपर्यंत 6 सुवर्ण पदके आपल्या नावे केली आहेत. याशिवाय 9 रौप्य आणि 5 कास्य पदकही भारताच्या नावे आहेत.
ज्यूनियर गटात भारताने आतापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाने, या स्पर्धेची सांगता केली. भारताने या चॅम्पियनशीपमध्ये एकूण 8 सुवर्ण पदक जिंकले. यात सहा मुली तर दोन मुलांचा समावेश आहे. भारताने कजाकिस्तानच्या बरोबरीने सुवर्ण पदके जिंकली. उज्बेकिस्तानचा संघ 9 सुवर्ण पदकासह पदक तालिकेत पहिल्या स्थानावर राहिला.
भारताकडून महिला गटात प्रिती दहिया (60 किलो), स्नेहा कुमारी (66 किलो), खुशी (75 किलो) आणि नेहा (54 किलो) यांनी सुवर्ण पदक जिंकले. दरम्यान कोरोना महामारीमुळे प्रवासासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतलेला नाही. खासकरून महिला गटात याचा परिणाम पाहिला मिळाला.
पुरूष गटात विश्वमित्र चोंगथम (51 किलो) आणि विशाल (80 किलो) यांनी सुवर्ण पदक जिंकले. महिला गटात प्रिती (57 किलो), तनिषा संधू (81 किलो), निवेदिता (48 किलो), तमन्ना (50 किलो), सिमरन (52 किलो) यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरूष गटात विश्वनाथ सुरेश (48 किलो), वंशज (63.5 किलो) आणि जयपीद रावत (71 किलो) हे रौप्य पदकाचे मानकरी ठरले.