दुबई - भारताचा विश्वमित्र चोंगथम याने एएसबीसी आशियाई युवा बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. त्याने पुरूष 51 किलो वजनी गटात हा कारनामा केला. विश्वमित्रने अंतिम सामन्यात उज्बेकिस्तानच्या कुजीबोव अहमदजोन याचा 4-1 ने पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. दुसरीकडे विश्वनाथ सुरेशचा अंतिम सामन्यात पराभव झाला. यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय बॉक्सर विश्वमित्र चोंगथम याने अंतिम सामन्यात सुरूवातीपासूनच उज्बेकिस्तानच्या बॉक्सरवर वर्चस्व निर्माण केले होते. त्याने सामन्यात प्रभावी बचावात्मक टेकनिक तसेच सुंदर फुटवर्क दाखवला. या सामन्यात दोन्ही बॉक्सिंगपटूनी जोरदार खेळ केला. परंतु विश्वमित्र यात वरचढ ठरला. त्याने संपूर्ण सामन्यात संयम राखत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी अचूक पंच मारले.
दुसरीकडे भारताचा विश्वनाथ सुरेशचा कजाकिस्तानच्या युवा विश्व चॅम्पियन संजर ताशकेनबे याने पराभव केला. 48 किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात विश्वनाथ सुरेशचा 5-0 ने पराभव झाला. या पराभवामुळे विश्वनाथ सुरेशला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.