मुंबई : महाराष्ट्रामध्ये जगप्रसिद्ध विम्बल्डन स्पर्धेचा सर्वात मोठा लोगो जमिनीवर साकारण्यात आला आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या ट्विटर हँडलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 57 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये गवतावर कलाकुसर करणारा कलाकारांचा गट 100,000 चौरस फूट जमिनीवर विम्बल्डनचा प्रतिकात्मक लोगो साकारताना दिसत आहे.
100,000 चौरस फूट क्षेत्रावर लोगो साकारला : व्हिडिओमध्ये लोगो बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. लोगोमध्ये हिरवे दृष्य तयार करण्यासाठी गवताचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी जमिनीचे खोदकाम आणि सिंचन करण्यात आले होते. व्हिडिओला प्लॅटफॉर्मवर आत्तापर्यंत तब्बल 8,30,000 पेक्षा जास्त वेळा पाहण्यात आले आहे. विम्बल्डनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'महाराष्ट्रातील गवत कलाकारांनी विम्बल्डनचा सर्वात मोठा लोगो तयार करण्यासाठी दोन आठवडे 100,000 चौरस फूट क्षेत्रावर काम केले.'
विम्बल्डन स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने : प्रतिष्ठेची विम्बल्डन स्पर्धा आता अंतिम टप्यात आली आहे. पुरुषांचा अंतिम सामना रविवारी खेळला जाणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात सर्बियाचा दिग्गज नोवाक जोकोविच समोर इटलीच्या जनिक सिन्नरचे आव्हान आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ समोर रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचे आव्हान आहे. शनिवारी महिलांचा अंतिम सामना चेक प्रजासत्ताकची मार्केटा वोंड्रोसोवा आणि ट्युनिशियाची ओन्स जाबेर यांच्यात होणार आहे.
रोहन बोपण्णाचा उपांत्य फेरीत पराभव : विम्बल्डनच्या पुरुष दुहेरी स्पर्धेत अनुभवी रोहन बोपण्णाने भारताचे प्रतिनिधित्व केले. तो वयाच्या 43 व्या वर्षी देखील टेनिसच्या सर्वोच्च स्तरावर खेळतो आहे. बोपण्णाने 2022 च्या पुरुष दुहेरी स्पर्धेचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनशी आपली जोडी जमवली आहे. या अनुभवी जोडीने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, मात्र गुरुवारी त्यांना नंबर वन सीडेड नील स्कुप्स्की आणि वेस्ली कूलहॉफ यांनी पराभूत केले.
हेही वाचा :
- Athletics Competition : वयाच्या ८१ व्या वर्षी पटकावले ३ सुवर्णपदक; दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
- R Ashwin Record : अश्विनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा रेकॉर्ड!, कोणालाही असे करणे अशक्यच
- Lakshya Sen : 21 वर्षीय लक्ष्य सेनने पटकावले कॅनडा ओपन स्पर्धेचे विजेतेपद