टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय हॉकी संघाने रियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता संघ अर्जेंटिनाचा पराभव केला. भारतीय संघाने या सामन्याच्या अखेरच्या दोन मिनिटात 2 गोल करत हा सामना 3-1 ने खिशात घातला. या विजयासह भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात वरुण कुमारने शानदार गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. तिसऱ्या क्वार्टरमधील अखेरच्या दोन मिनिटात वरुणने शानदार ड्रॅग फ्लिकवर गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. वरूणचा प्रहार इतका जोरदार होता की, विरोधी खेळाडूंसह गोलकिपरला देखील चेंडू रोखता आला नाही. वरुणच्या या अप्रतिम गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वरुण कुमारने ऑलिम्पिक करियरमध्ये पहिला गोल करत आपली प्रतिभा दाखवून दिली. भारताकडून वरुण, विवेक सागर, हरमनप्रीत यांनी प्रत्येकी एक -एक गोल केलं. 26 वर्षीय वरुणचा हा ऑलिम्पिकमधील डेब्यू सामना होता.
वरूण कुमार बद्दल...
वरुण कुमार हॉकी इंडिया लीग आणि भारतीय राष्ट्रीय संघात पंजाब वारियर्ससाठी डिफेंडर म्हणून खेळतो. वरुणचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्याने 2012 मध्ये ज्यूनियर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये पंजाब राज्याचे प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी करत आपली छाप सोडली.
भारतीय संघ ग्रुप ए मध्ये दुसऱ्या स्थानावर -
भारतीय संघ ग्रुप ए मध्ये तीन विजयासह 9 गुण मिळवत दुसरे स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया सर्वच्या सर्व ४ सामने जिंकून १२ गुणासह अव्वल स्थानावर आहे. तर स्पेन न्यूझीलंड आणि अर्जेंटिनाच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. पण, गोल सरासरीच्या जोरावर स्पेन तिसऱ्या, न्यूझीलंडने चौथ्या आणि अर्जेंटिना पाचव्या स्थानावर आहे. यजमान जपान एक गुणासह तळाशी आहे.
हेही वाचा -Tokyo Olympics: सुवर्णपदक विजेत्याचा धुव्वा उडवत भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत
हेही वाचा -Tokyo Olympics: तिरंदाजीत अतनु दासचा अचूक लक्ष्य भेद; शूट ऑफमध्ये गोल्ड मेडलिस्टला चारली धूळ