टोकियो -भारतीय हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकधील दुसऱ्या सामन्यात दारूण पराभव पत्कारावा लागला. ग्रुप ए मधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 7-1 ने धुव्वा उडवला.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव करत आश्वासक सुरूवात केली होती. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ संपूर्णपणे निष्प्रभ दिसला. भारतीय संघाची बचावफळी दुबळी असल्याचे दिसून आले. परिणामी भारतीय संघाला ऑलिम्पिक इतिहासात सर्वात लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले.
सामन्याच्या 10व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर डॅनिएल जेम्सने गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सामन्याच्या 26 मिनिटांपर्यंत ही आघाडी 4-0 अशी केली. 21व्या मिनिटाला जेरेमी हेवर्ड्स, 23व्या मिनिटाला फ्लीन ओगिलव्हीइने तर 26व्या मिनिटाला जोशूआ बेल्ट्ज याने गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये भारताने आक्रमक खेळ केला. पण, ते गोल करण्यात अपयशी ठरले.