नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारत विरुद्ध बेल्जियम हा उपांत्य फेरीतील हॉकी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा पराभव झाला. बेल्जियमने या सामन्यात भारताला 5-2 अशी मात दिली. दरम्यान, हा सामना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीवर पाहिला. पराभवानंतर मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाचे मनोबल वाढवले. तसेच कर्णधार मनप्रीत सिंह याच्याची फोनवर चर्चा देखील केली.
सामना पाहत असल्याचे मोदींनी ट्विट करत सांगितलं -
बेल्जियम विरुद्ध भारत सामना सुरू असताना मोदी यांनी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणाले की, 'मी टोकियो ऑलिम्पिकचा भारत विरुद्ध बेल्जियम हॉकी पुरूष उपांत्य फेरीचा सामना पाहात आहे. मला आपला संघ आणि संघाच्या कौशल्याचा अभिमान आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा'
पराभवानंतर मोदींनी वाढवलं भारतीय संघाचं मनोबल -
भारतीय संघ बेल्जियमकडून पराभूत झाला. यानंतर मोदींनी ट्विट करत भारतीय खेळाडूंची मनोबल वाढवले. मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'हार-जीत हा जीवनाचा भाग आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या पुरूष हॉकी संघाने सर्वश्रेष्ठ दिलं आणि हेच महत्वाचं आहे. संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूवर अभिमान आहे.'