मुंबई- आज राष्ट्रीय क्रीडा दिवस. भारतीय हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनानिमित्त संपूर्ण भारतात आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्यास प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाप्रती जागरुकता निर्माण व्हावी, हा यामागील उद्देश. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मैदानी खेळांचे महत्त्व कमी होताना दिसते. इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे खेळ हा प्रत्येकाच्या हातात खेळला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जागतिक क्रीडा दिवस २०१९ : हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद... आजच्या दिवशी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मेजर ध्यानचंद यांची ओळख -
ध्यानचंद यांचा जन्म अलहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ साली राजपूत घराण्यात झाला. १६ व्या वर्षी सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता.
मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत होते. त्यामुळे त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यानसिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.
फुटबॉलमध्ये जसे पेले, क्रिकेटमध्ये जसे ब्रॅडमन तसे हॉकीमध्ये ध्यानचंद यांना मानले जाते. ध्यानचंद यांना पद्मभुषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ध्यानचंद यांच्या युगामध्ये भारताने ऑलिम्पिकमध्ये 'सुवर्णयुग' निर्माण केले होते. भारताने १९२८ ते १९५६ या कालावधीत सातत्याने हॉकीत ऑलिम्पिक विजेतेपद टिकविले होते. ध्यानचंद यांचा समावेश भारतीय संघात असताना भारताने ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ३३८ गोल नोंदविले होते. त्यापैकी १३३ गोल ध्यानचंद यांनी केले होते.
दोन महायुद्धांमुळे ध्यानचंद यांच्या कारकीर्दीत खंड पडला असे म्हटले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संघाने पूर्व आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात ध्यानचंद यांनी २२ सामन्यांमध्ये ६१ गोल केले. यावेळी त्यांचे वय ४२ वर्षे होते. चाळिशी ओलांडल्यानंतरही त्यांची गोल करण्याची शैली अतुलनीयच होती.
ध्यानचंद यांनी तीन ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. यामध्ये तीनही वेळा भारताने सुवर्णपदक जिंकले. एकदा तर हॉलंड विरुध्दच्या सामन्यात ध्यानचंद यांच्या हॉकी स्टीकमध्ये चुंबक असल्याच्या संशयावरुन त्यांची स्टीक तोडून तपासणी करण्यात आली. ध्यानचंद यांच्याकडे चेंडू गेला की, गोल झाला असे विरोधी संघ समजत असत.