नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाची डिफेंडर आणि माजी कर्णधार सुनिता लाकडाने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. सुनिता २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियाई स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय संघाची सदस्य होती. तिने भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली होती.
सुनिता मागील काही महिन्यांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होती. यामुळे तिने निवृत्तीचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना सुनिताने सांगितले की, 'गुडघ्यावर पुन्हा एकदा सर्जरी करावी लागणार आहे. यामुळे मी निवृत्तीचा निर्णय घेत आहे.'
आजचा दिवस माझ्यासाठी खूपच भावूक ठरला, कारण मी आज आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त होत आहे, असेही सुनिताने सांगितले. त्यामुळे २८ वर्षीय सुनिताचे टोकियो ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.