मुंबई - कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजला आहे. या विषाणूमुळे जगभरातील ६ हजार लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. धोक्याची बाब म्हणजे, दिवसागणिक हा आकडा वाढतच चालला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणीची घोषणा केली असून प्रत्येक देश आपआपल्यापरीने उपाययोजनेसाठी एकवटले आहेत. अशात पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुढाकार घेतला आहे.
रोनाल्डोने जगभरातील आपल्या चाहत्यांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. त्यासोबतच त्याने पोर्तुगालमधील त्याच्या सर्व हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूने संक्रमित असलेल्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचाही निर्णय त्याने घेतला आहे. एवढेच नव्हे, तर येथे उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचा पगारही रोनाल्डो स्वतःच्या खिशातून करणार आहे.