माद्रिद- कोपा डेल रेच्या उपांत्यफेरीतील दुसऱ्या सामन्यात रिअल माद्रिदसमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचे कडवे आव्हान होते. घरच्या मैदानावर खेळणाऱ्यारिअल माद्रिदला बार्सिलोनाकडून ३-०, अशा पराभवाला सामोर जावे लागले. लुईस सुआरेझने २ गोल करत बार्सिलोनाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
दुसऱ्या फेरीच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. सामन्याच्या सुरुवातीपासून रिअलने आक्रमक खेळ करताना अनेक संधी निर्माण केल्या. रिअलचा १८ वर्षीय खेळाडू व्हिनिशिअस ज्यूनियरने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. परंतु, संघाला गोल करण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
बार्सिलोनाने सामन्याच्या दुसऱया सत्रात मिळालेल्या संधीचा फायदा घेत रिअलचा बचाव भेदून काढला. लुईस सुआरेझने ५० व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा फायदा घेत गोल केला. बार्सिलोनाने केलेल्या आक्रमक खेळामुळे रिअलकडून चुका होत गेल्या. चेंडूचा ताबा घेण्याचा नादात राफायल वरानकडून स्वयंगोल झाल्याने बार्सिलोनाची आघाडी २-० अशी झाली. यानंतर, कॅसिमिरोने सुआरेझला चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे बार्सिलोनाला पेनल्टी मिळाली. सुआरेझने कोणतीही चूक न करता ७३ व्या मिनिटाल गोल करत सामना ३-० असा जिंकला.
रिअल माद्रिदने संपूर्ण सामन्यात चांगला खेळ केला परंतु, संघाला गोल करण्यात अपयश आले. गेल्या ६ वर्षात बार्सिलोनाने कोपा डेल रे स्पर्धेत विक्रमी सलग ५ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारा बार्सिलोना पहिला संघ ठरला आहे.