माद्रिद- मागील ५ पैकी ४ सामन्यात पराभव झाल्यानंतर रिअल माद्रिदचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. रिअलने चांगली कामगिरी करताना यजमान व्हॅलाडॉलिड संघावर ४-१ असा विजय मिळवला. कर्णधार करिम बेंझेमाने संघासाठी २ गोल करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
LA LIGA : सलगच्या पराभवानंतर रिअल माद्रिद विजयी मार्गावर
रिअलने चांगली कामगिरी करताना यजमान व्हॅलाडॉलिड संघावर ४-१ असा विजय मिळवला. कर्णधार करिम बेंझेमाने संघासाठी २ गोल करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
सामन्याच्या सुरुवातील यजमान व्हॅलाडॉलिड संघाने आक्रमक खेळ करत रिअल माद्रिदवर दबाव आणला होता. व्हॅलाडॉलिड संघाने काही अप्रतिम चाली रचताना गोल केले. परंतु, ऑफसाईड असल्यामुळे गोल नाकारण्यात आले. व्हॅलाडॉलिडला आक्रमक खेळाचा फायदा २९ व्या मिनिटाला झाला. अनवर तुहामी याने सुरेख गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. माद्रिदनेही आक्रमक खेळ करत ३४ व्या मिनिटाला राफेर व्हरानच्या गोलच्या बळावर सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
कर्णधार करिम बेंझेमाने पेनल्टीवर ५१ व्या मिनिटाला आणि हेडरद्वारे ५९ व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी ३-१ अशी केली. बॅलॉन डि ओरचा विजेता लुका मॉड्रिकनेही चांगला खेळ करताना ८५ व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय ४-१ असा निश्चित केला. मागील ६ सामन्यात रिअलचा हा पहिला विजय ठरला. युरोपातील बलाढ्य संघ अशी ओळख असलेल्या रिअल माद्रिद यावर्षी सर्व मोठ्या स्पर्धांतून बाहेर पडला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि माजी प्रशिक्षक झिदाने यांनी क्लबला सोडल्यानंतर संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे.