नवी दिल्ली - जुव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे पछाडत यंदाच्या 'बलोन डी ओर' पुरस्कारावर मेस्सीने आपले नाव कोरले. त्यामुळे मेस्सीने सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’चा (Ballon d'Or) पुरस्कार खिशात घातला. आता अजुन एका विक्रमात मेस्सीने रोनाल्डोला पछाडले आहे.
हेही वाचा -रणजीचा आजपासून रंगणार थरार, 'या' नवीन संघाकडे सर्वांचे लक्ष!
मायोर्काविरुद्धच्या सामन्यात बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पेनमधील स्पर्धा ला लिगात आपल्या ३५ व्या हॅट्ट्रिकची नोंद केली. त्यामुळे या स्पर्धेत सर्वाधिक हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. मेस्सीच्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोनाने आरसीडी मायोर्का संघावर ५-२ अशी मात केली. मेस्सीने या सामन्याच्या १७, ४१ आणि ८३ व्या मिनिटाला गोल केले.
या सामन्याआधी मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोघांनीही ला लिगामध्ये ३४ हॅट्ट्रिक केल्या होत्या. मात्र, मेस्सीने त्याला पछा़डले आहे. पोर्तुगाल आणि जुव्हेंटसच्या रोनाल्डो आणि नेदरलँड्सच्या व्हर्जिन व्हॅन डिज्जाकला मागे पछाडत मेस्सीने यंदाचा ‘बलोन डी ओर’चा (Ballon d'Or) पुरस्कार जिंकला.
रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये हा पुरस्कार पाच वेळा जिंकला आहे. तर, मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५ मध्ये आणि यंदाचा पुरस्कार पटकावला आहे.