बर्लिन - पोलंडचा कर्णधार आणि बायर्न म्युनिककडून खेळणारा रॉबर्ट लेवंडोवस्कीला यंदाच्या फिफाच्या सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. लेवंडोवस्कीसह पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.
हेही वाचा -विराट, धोनी, रोहित नव्हे, तर 'हा' खेळाडू लाराचा लाडका!
२०१९-२०च्या चॅम्पियन्स लीगमधील १५ गोलच्या जोरावर लेवंडोवस्कीने आपला क्लब बायर्न म्युनिकला विजेता केले होते. ३२ वर्षीय पोलंडच्या लेवंडोवस्कीने यावर्षी बुंडेस्लिगा आणि यूएफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे.
उत्कृष्ट कामगिरीमुळे लेवंडोवस्की यंदाच्या प्रतिष्ठित बालोन डी ओर चषकाचा दावेदार ठरला. परंतु कोरोनोव्हायरसमुळे हा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला. १९५६ पासून फिफाचा हा पुरस्कार जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला दरवर्षी दिला जातो. या पुरस्कार निवडीमध्ये १८० सदस्य असतात.
हा सोहळा रद्द झाल्याबद्दल बायर्न म्युनिकच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार सोहळा सप्टेंबरमध्ये होणार होता, परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हा कार्यक्रम १७ डिसेंबरला होणार आहे.