बार्सिलोना- चॅम्पियन्स लीगमध्ये अंतिम-१६ साठी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात यजमान बार्सिलोनासमोर लायनचे आव्हान होते. बार्सिलोनाने लियोनल मेस्सीच्या शानदार खेळाच्या बळावर लायनचा ५-१ अशा मोठ्या फरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
बार्सिलोनाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. मेस्सीने १७ व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर, ३१ व्या मिनिटाला फिलिपे कुटिन्होने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. लायनच्या संघाने काही चाली रचल्या परंतु, गोल करण्यात त्यांना अपयश आले.
दुसऱया सत्रात ५८ व्या मिनिटाला लायनकडून लुकास टोसार्टने गोल करत बार्सिलोनाची आघाडी २-१ अशी कमी केली. परंतु, सामन्याच्या उत्तरार्धात लियोनल मेस्सीने आक्रमक खेळ करत लायनला कोणतीही संधी दिली नाही. ७८ व्या मिनिटाला मेस्सीने संघासाठी तिसरा आणि वैयक्तीक दुसरा गोल करत आघाडी ३-१ अशी केली. यानंतर, गेरार्ड पिकेने ८१ व्या मिनिटाला आणि डेम्बेलेने ८६ व्या मिनिटाला गोल करत संघाचा ५-१ असा विजय निश्चित केला.
चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बार्सिलोनाने सलग १२ वेळा प्रवेश केला आहे. घरच्या मैदानावर बार्सिलोनाचा संघ चॅम्पियन्स लीगमध्ये मागील ३० सामन्यात अपराजित आहे. अशी कामगिरी करणार बार्सिलोना एकमेव संघ आहे.