मुंबई - भारताचे माजी फुटबॉलपटू सईद शाहिद हकिम याचं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. आज रविवारी कर्नाटकच्या गुलबर्गा येथील रुग्णालयात त्यांनीअखेरचा श्वास घेतला. याची माहिती हकिम यांच्या कुटुंबियांनी दिली.
हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सईद शाहिद हकिम यांना गुलबर्गा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पाच दशकाहून अधिक काळ भारतीय फुटबॉल सोबत जोडले गेले होते.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेता सईद शाहिद हकिम हे 1982 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिवंगत पी के बॅनर्जी यांचे सहाय्यक प्रशिक्षक राहिले आणि मर्डेका कप दरम्यान, नॅशनल संघाचे त्यांनी प्रशिक्षकपद भूषवलं होतं. स्थानिक स्तरावर त्यांनी आपली छाप सोडली. त्यांच्या मार्गदर्शनात महिंद्रा अँड महिंद्रा आताचा महिंद्रा यूनायटेड क्लबने 1988 साली बलाढ्य वेस्ट बंगालचा पराभव करत डुरंड कप जिंकला होता. याशिवाय ते सालगावकर यांचे देखील कोचहोते.